"हा शेवटी 'क्वालिटी ऑफ लाइफ'चा प्रश्न आहे पपा. जीवनाचा दर्जा तुमच्या भाषेत. इथे अशी काय ‘क्वालिटी ऑफ लाइफ’ आहे पपा, की जिच्यासाठी तुम्ही या देशाला लोंबकळत राहावं? माझ्याबरोबर चला. तिथे राहा. देशप्रेमच दाखवायचं तर तिथून इथल्या कार्याना पैसा पुरवा. वर्षांकाठी एकेक व्हिजिट करा. मी तेवढं पुरवू शकतो तुम्हाला. साधी वीज दिवसभर पुरवता येत नाही तुमच्या लोकांना! प्रचंड गर्दी. प्रचंड महागाई. छोटय़ा दैनंदिनीच्या गोष्टींसाठी कटकटी. पाय ओढण्याची वृत्ती. तुम्ही लोक ही सगळी अनागोंदी चालवून कशी घेता, याचंच मला आश्चर्य वाटतं.’’ ..परदेशाहून सुट्टीसाठी आलेला मुलगा तावातावानं बोलत होता. अगोदरच विमानतळावरच्या गर्दीनं, ट्रॅफिकने तो त्रासला होता. त्यात पुण्याला घरी पोचल्यावर वीजपुरवठा खंडित झालेला! त्या तीस- तीस किलो वजनाच्या बॅगा लिफ्टऐवजी जिन्यावरून वाहून वर न्यायला लागल्या. त्याची चिडचिड झाली. ऐनवेळी इंटरनेटने दगा दिल्याने ती आणखीच वाढली. रात्री निजण्यापूर्वी उद्रेक झाला.
पपांनी हे सगळं ऐकून घेतलं. मुलाला इथे आल्या-आल्या त्रास झाला, याची त्यांनाही खंत होतीच. पण तेवढय़ावरून लगेच आपण इथला गाशा गुंडाळावा असं त्यांना वाटणं शक्य नव्हतं. त्यांचं इथं नीट चाललं होतं किंबहुना काही बाबतीत तर पूर्वीपेक्षा खूप चांगलं चाललं होतं. नेहमी एखाद्या मॉलमध्ये, सुपर मार्केटमध्ये जायची वेळ आली की तिथल्या प्रचंड, आकर्षक मालाने ते प्रभावित व्हायचे. ते लहान असताना घरच्यांच्या सांगण्यावरून हातात बरणी घेऊन, दूध किंवा तेल आणायला जावं लागलं की त्यांना फार लाज वाटायची. ज्या दिवशी हे पातळ पदार्थ आपल्याला आयते पॅकिंगमध्ये मिळतील, तो सुदिन असं वाटायचं. आता बाजारपेठा देखण्या पॅकिंगने बहरल्या होत्या. खाद्यपदार्थ, खेळणी, कपडालत्ता.. सगळ्यांची रेलचेल. परदेशात राहणाऱ्या पोराला याचं अप्रूप समजणार नाही, म्हणून ते सांगायला लागले..
‘‘तुला कल्पनासुद्धा करता येणार नाही, इतक्या अडचणीत, टंचाईत आम्ही जगलोय. तू जन्मलास ना, तेव्हा बाजारात तांदूळ मिळत नसे. म्हणजे, रेशनव्यतिरिक्त! बाळंतिणीला म्हणजे तुझ्या आईला, जुन्या चांगल्या तांदळाचा पौष्टिक भात मिळावा, यासाठी तुझ्या आजीने वणवण करून तांदूळ मिळवला. तुझ्या मुंजीत स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा होता. घरात पोळ्या करण्यासाठी स्टोव्ह वापरावा लागायचा. मग रॉकेलच्या मागे फिरणं आलंच. कधी वनस्पती तूप नाही; कधी साखर नाही, कधी जेवणावळी घालायला परवानगी नाही, कधी दूध पुरेसं उपलब्ध नाही, अशी सर्व प्रकारची टंचाई अनुभवली आम्ही. मुळात आमच्याकडे पैसाही नव्हता, पण ज्यांच्याकडे तो होता त्यांना दैनंदिनीच्या कटकटी होत्या. स्कूटर विकत घ्यायला तीन-तीन वर्षांच्या प्रतीक्षा याद्या होत्या, माहितीये? स्वत:चा टेलिफोन असणं हे ‘स्वप्न’ होतं! मग पुढे डिपॉझिट भरा, कुठे व्ही.आय.पी. कोटय़ात शिरा, अशा लटपटी करायच्या! प्रवासाला जावं तर मोजकी वाहनं. त्यांची तिकिटं मिळवायला त्रास, प्रवास करण्यात अडचणी, वाटेत खाणं-पिणं-स्वच्छतागृहं वगैरेंच्या अडचणी. आता बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसल्या जागी सकाळच्या पहिल्या चहापासून, वृत्तपत्रापासून सगळं मिळतं प्रवाशांना. पुणे-मुंबई प्रवास म्हणजेसुद्धा डोकेदुखी होती. जुन्या रस्त्याने पाच-सहा तास सहज लागायचे. घाट चढून उन्हाळ्यात मोटारी गरम व्हायच्या. बंदसुद्धा पडायच्या. आता मोटारीने एक्स्प्रेस-वेवरून शेजारची झाडं-फुलं बघताना मुंबई कधी येते, हे समजतसुद्धा नाही. घरात एक टेबलफॅन, तो हवा तेव्हा हवा तिथे नेऊन गारवा घेणारे आम्ही लोक. आमच्यापैकी पुष्कळांनी आता वातानुकूलनयंत्रं घेतली आहेत.’’
पोरानं थोडा वेळ चिकाटीनं हे ऐकून घेतलं, पण शेवटी उसळलाच. म्हणाला, ‘‘ओ. के. तुम्ही फार प्रगती केलीत. मान्य. पण त्याच्यात तुमचा वाटा किती? आणि एकूण जगभरातल्या भरभराटीचा वाटा किती?’’ ‘‘कोणाच्याही कोंबडय़ानं का होईना, पण उजाडलं की उजाडतंच राजा’’. ‘‘मग बसा तो उजेड कवटाळत. एरवी कवटाळण्याजोगं आहे काय तुमच्याकडे? तिकडे न्यूयॉर्कमध्ये पाच वर्षांत पाच मिनिटं वीज गेल्याचं ऐकलं नाही आम्ही कोणी. आणि एकदा घालून दिलेली घडी, बसवून दिलेली व्यवस्था-यंत्रणा कोणी मोडेल याची तर शहामतच नाही. सगळे व्यवहार कसे व्यवस्थित चालतात. दिवसाचे बारा-चौदा तास काम करतात सगळे. कामाची लाज नाही.. बाऊ नाही.. टाळाटाळ नाही. इथे सगळे कामचुकार लोक.. सगळ्यांना बसून खायला हवं..’’
‘‘खरंय तू म्हणतोस ते. पण याची उलटी बाजू बघ ना. इतका कामचुकार माणसं असूनही आम्ही इतपत प्रगती करू शकलो. मग तुमच्यासारखी एवढी कामसू, कार्यसंस्कृती जपणारी, वर्कोहोलिक की काय म्हणतात तशी माणसं इथे आली तर केवढा कायापालट होईल आमच्या देशाचा?’’
पोरानं उत्तर दिलं नाही. त्याला द्यायचं नसेल किंवा त्याच्यापाशी मुळात उत्तरच नसेल, या कल्पनेने पपा थोडा वेळ शांत राहिले. मग हलकेच म्हणाले, ‘‘आणि आश्चर्याचंच म्हणशील तर, कधी कधी आम्हालासुद्धा तुमचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही, बरं का! इकडे असेपर्यंत घरात चमचाही उचलत नाही तुम्ही. तिकडे पहिली नोकरी हॉटेलातल्या कप-बशा विसळण्याची करता. तेवढीच निष्ठा तेवढेच कष्ट तुम्ही इथे लावलेत तर कुठल्या कुठे जाऊ आपण, असं तुमच्यापैकी कोणालाच कसं वाटत नाही? दुरून- दुरून सल्ले देता, पैसे पाठवता हे ठीकच आहे. एवढं करावंसं वाटतंय, याला दाद देतो आम्ही. पण या काठावरच्या पोहण्यापेक्षा थेट मध्यावर उडी मारावी, सगळं पाणी असं हातानं पोटाशी घ्यावं, पायानं दूर लोटावं आणि पुढे पुढे जावं, मागच्यांची वाट सोपी करावी असं वाटणारा एकही मायेचा पूत का रे निघत नाही तुमच्यामध्ये?..’’
‘‘मला नाका-तोंडात पाणी जाऊन बुडायची हौस नाहीये पपा’’ पोरगा तिरीमिरीने म्हणाला. उठून गेला, पपांनी त्याला थांबवला नाही. आधीच बिचारा प्रवासाने, जेटलॅगने कंटाळलेला होता. त्यात त्याला आणखी मनस्ताप द्यायचा पपांचा इरादा नव्हता.
तरीही कशी कोण जाणे, आता त्यालाही चटकन झोप लागली नाही आणि बाहेर पपांचे डोळेही सहजासहजी मिटले नाहीत.
मंगला गोडबोले
लोड होत आहे...